तुझं माझं प्रेम.....
एक स्वप्न, जागेपणी पाहिलेलं
वास्तवात कधीच न उतरलेलं
तुझं माझं प्रेम.....
एक दुर्भागी जलबिंदू झालेलं
द्वेषाचा भडाग्नीने वाफ होऊन उडालेलं
तुझं माझं प्रेम.....
एक कमनशिबी क्षितीज असलेलं
भू-गगनाच्या मिलनाला कायमचे मुकलेलं
तुझं माझं प्रेम.....
नशिबान जवळ आणलेलं
हट्टापायी तुझ्या तितकंच दुरावलेलं
तुझं माझं प्रेम.....
एक गर्भपात झालेलं
जन्माला येण्यापूर्वी पोटातच मारलेलं
तुझं माझं प्रेम.....
दगडासारखं भक्कम वाटलेलं
शेवटी धूळ होऊन आसमंतात उडालेलं
तुझं माझं प्रेम.....
प्रेमालाच आपण टाळलेलं
द्वेषाचा चाळणीतून आपसूक गाळलेलं
तुझं माझं प्रेम.....
एक छळवादी नभ असलेलं
न बरसता गरजून गेलेलं
तुझं माझं प्रेम.....
एक बेसूर गीत बनलेलं
सूर ताल सारं सारं बिनसलेलं
तुझं माझं प्रेम.....
एक अनंत गूढ होऊन बसलेलं
वाळूचं तेल गळूनही न उकल लेलं
तुझं माझं प्रेम.....
आता संपलेलं संपलेलं
संपण्यापूर्वी कधीच न झालेलं